Friday, May 27, 2011

हॉट एअर बलून फेस्टीवल

(जून २६, २०१०)

पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की इथे सर्वांना भटकायचे वेध लागतात. अर्थात तेही ठीकच आहे म्हणा कारण उन्हाळ्याच्या ह्याच तीन चार महिन्यात मनसोक्त भटकायला मिळतं. मग आहेच थंडीत बाहेरचा पांढरा एकसुरी रंग बघत दिवस रात्र घालवणं!

एप्रिल महिन्यांपासूनच छोट्या छोट्या गावांच्या जत्रा सुरु होतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यापैकीच 'हॉवेल' हे एक छोटंसं गाव. त्यांच्या 'हॉट एअर बलून फेस्टीवल' बद्धल बरंच ऐकलं होतं पण घराच्या अवघ्या तासा-दोन तासांच्या अंतरावर असूनही जाणं मात्र झालं नव्हतं. मागच्याच आठवड्यात नायगारादर्शन करून आलेलो त्यामुळे पाकिट तसं अशक्तच होतं म्हणून मग ह्या विकांतचा ("विकांत" हा काही मराठी संस्थळांनी मराठी भाषेला प्रदान केलेला अनमोल शब्द) कार्यक्रम म्हणून हॉवेल ला जाण्याचं निश्चित केलं.

शुक्रवारी काही मित्रांबरोबर 'काव्य-शास्त्र-विनोद' ;-) करण्यासाठी भेटलो होतो,  तेव्हा बोलुन गेलो. मग सगळ्यांनीच इंट्रेस्ट दाखवला.. आणि फटाफट प्रोग्रॅम बनला. आगोदर "सक्काळी लवकर ७ ला निघुया. त्यांचं डाउनटाउन फिरुया" म्हणणारे लोक हळूहळू ('का-शा-वि' बराच वेळ चालू राहिल्यामुळे सकाळी उठायला उशीर होईल हे जाणवल्यामुळे..) "दुपारी जेवण झाल्यावर निघू आरामात.. नाहीतरी बलून फेस्टीवल संध्याकाळी सहाला आहे" म्हणायला लागले. मग कोण कोण एकत्र येणार वगैरे ठरलं आणि सभा बरखास्त झाली. मंडळी आपापल्या घरी परतली.

त्यांच्यापैकी किती जणं खरोखर उगवणार आहेत ह्याबद्धल मला जरा शंका होतीच त्यामुळे आम्ही (म्हणजे मी, ही आणि छोकरा) आमच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणेच दोन वाजता घरातून निघालो. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही तिथे पोहोचेतोवर बरचसं मित्रमंडळ (आणी त्यांच्या मंडळी) तिथे पर्फेक्ट त्याच दरम्यान पोचलं. (शिकलेला धडा: पुन्हा कधी कुठे एका ठरावि़क ठिकाणी भेटायचं असेल तर आदल्या दिवशी 'का-शा-वि' आणि भेटायची नक्की वेळ _न_ ठरवणे.)

असो... मी लांबण जरा जास्तच लावलंय. तर आता थेट फोटोंकडे जातो.

हवाई-उड्या (स्काय्-डायविंग) व राष्ट्रगीताने प्रोग्रॅमची सुरुवात झकास झाली..

(इथे विडियो चढवायचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. दिसत असेल अशी आशा आहे. नसेल तर सांगा)


नंतर मग फुगेवाले (!) त्यांच्या तयारीला लागले. बहुतेक जणं त्यांच्या कुटुंब्-कबिल्यासह आलेले होते. प्रत्येकाची तयारी आणि कसब वाखाणण्यासारखं होतं.









आधी वार्‍याची दिशा व वेग समजाउन घेण्यासाठी १६ इंचाचा एक साधा फुगा हवेत सोडतात व त्यांच्याकडच्या यंत्रांनी त्याचा वेग मोजतात. जर वारा जास्त असता तर मग प्रोग्रॅम कदाचीत रद्द केला असता.


सगळं आलबेल झालं आणि पहील्या फुग्यानी जमीन सोडली..


हे पुढचे काही फोटो म्हणजे माझी फोटोग्राफिची खाज भागवून घेण्याचे धंदे आहेत. अर्थात इथल्या दिग्गजांपुढे मी म्हणजे 'सुर्व्याने काजव्यापुढे चमकन्यासारखे.. वगैरे वगैरे'





एकापाठोपाठ एक असे जवळजवळ तीस पस्तीस फुगे वर जात राहीले.





एक अचानक आलेल्या वार्‍यामुळे एका झाडाच्या फांदीतच अडकत होता.. पण मोठ्या शितफीनं त्याच्या मालकिणीनं सोडवून नेला..










ह्या फुग्यांना सांभाळायचं म्हणजे खायचं काम नाही.. चांगलाच घामट्या निघत होता..... (आम्ही आरामात भेळेचे तोबरे भरत भरत पंख्याने हवा खात होतो)









निरभ्र आकाशाची निळाई वगैरे वगैरे... छे! कविता वगैरे आपला प्रांतच नाही.











एक हॉलोवीन स्पेशल फुगा :) ह्या लोकांना चेटकिणीचं फार कौतिक... आमच्या कोकणात या म्हणावं पारापारावर मुंजे आणि आडा-विहीरींवर हडळी सापडतील!






काही काही फुगे 'स्पॉन्सर' केलेले होते..




हा हा म्हणता दोन तास उलटून गेले.. तरी अजुन उड्डाण चालूच होतं.





















तर अशा प्रकारे आणखी एक विकांत चांगल्या कामी आला. चविष्ट भेळ, मित्र-मैत्रिणींची सोबत आणी मस्त संध्याकाळ.. आणखी काय हवं?

Wednesday, May 18, 2011

बागेतला फेरफटका

(२४-जुलै-२०१०)



काही दिवसांपुर्वी सहज म्हणून घराजवळच्याच एका पार्कमधे गेलो होतो. आमच्या घराजवळच्या एका पार्क (केन्सिन्ग्टन मेट्रोपार्क) मधले हे फोटो आहेत. फार काही प्रसिद्ध असा नाही हा पार्क पण बराच मोठा (आकाराने) आहे. त्या पार्कमधल्या एका ट्रेल वर फिरायला गेलो असताना मी आणि ही'ने काढलेले आहेत. अशा बर्‍याच ट्रेल्स आहेत तिथे.. आणखी दोन -तीन तलाव आहेत. विशेष म्हणजे हे तलाव कृत्रिम आहेत... फार खोलही नाहीत. काही भाग फिशिंगसाठि उपलब्ध आहेत. काही ठिकाणी बोटिंगची सोय आहे. काही ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी बीच बनवलेले आहेत. तर.. फोटो...

शुभ्र पांढरी कमळं...


मला सुचलेलं नाव.. हिरण्यगर्भ

मस्त भलं मोठं पान


करकोचा (सॅन्डहील क्रेन)

ह्यांची घरटी अगदी झाडाच्या टोकाच्या फांदीवर असतात..
बदकं / गीस..
आणि हंस..

बुलबुल सारखा दिसणारा हा पक्षी.. फक्त बुलबुलसारखा शेपटीखाली लाल डाग नव्हता.. त्या ऐवजी दोन्ही पंखांखाली लाल डाग होते..

इथली करवंद?? अशा लाल, काळ्या, निळ्या बेरींची झाडं खूप होती


ही कसली फुलं आहेत माहित नाही पण त्यांच्या जवळून गेलं की त्याच्या सुवासाच्या घमघमाटानं मस्त फ्रेश वाटत होतं.

इथल्या भाषेत ह्या फुलाला "निअरली वाईल्ड रोज" म्हणतात.. "जवळजवळ गावठी गुलाब".. ऐकायला मजेशीर वाटतं..

आणखी थोडी रानटी/गावठी(?) फुलं




मोठं ऐट्बाज फुल.. गावठी वाटत नाही.

चतुर... (असे फोटो काढताना कॅमेराचं आणि माझं फोटोग्राफिचं ज्ञान यातला तोकडेपणा जाणवतो..)

इथे त्या फुलांच्यावर असलेल्या कोळ्याचा फोटो काढायचा होता... पण साध्या कॅमेराने काढताना झूम/फोकस गंडलं.. फोटो काढता येइना लेन्स वाकडं.. हेच खरं.
एक गमतीशीर पाटी..

अशी मस्त संध्याकाळ असावी, जवळ तुमची आवडती माणसं असावी.. मग आणखी काय हवं??