Thursday, September 27, 2012

पानगळती सुरू झाली होssss!


बघता बघता उन्हाळा कधी संपला समजलंच नाही. अर्थात थंडी पडायला सुरूवात झालेलीच आहे पण 'दिल है के मानता नही।'. ते असो. आपण कितीही नाही म्हटलं तरी वेळ कोणासाठी थांबतो? येणार्‍या दिवसांचं स्वागत उल्हासाने करायचं हे शिकवण्यासाठीच जणू सगळा निसर्गच कसा नटलाय!  त्याच्या पानांच्या वेगवेगळ्या छटा बघण्यासाठी म्हणून लोकं कुठे कुठे जातात! पण असं आवर्जून जाऊन बघण्यापेक्षा अनपेक्षित पणे जेव्हा त्याचं सौंदर्य दिसतं तेव्हा मात्र एक वेगळाच आनंद मिळतो. आज मुलाला शाळेत सोडताना त्याच्या शाळेच्या वाटेवरच एका ठिकाणी असंच दर्शन घडलं. तिथेच थांबून मधुराने घेतलेले हे काही फोटो. सूर्य नुकताच उगवत असतानाचे हे फोटो आहेत. जसा जसा सूर्य वर येत गेला तसे तसे रंग बदलत जाताना दिसत आहेत.













Sunday, August 14, 2011

दामिनी

कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला. विजांचं तांडव बघताना दोन दोन मिनिटांच्या विडियो क्लिप्स रेकोर्ड केल्या आणि त्यातून विजांचे मस्त शॉटस मिळाले.










Tuesday, July 12, 2011

बॉस्टन टी पार्टी !

सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत "कुठेतरी लांब" जाऊया असा आग्रह सुरू झाला. पण कुठेतरी लांब म्हणजे नक्की कुठे त्यावर  काही एकमत होत नव्हतं. एकदा सहज फोनवर गप्पा मारताना दामले "या कधीतरी घरी या भागात आलात तर!" असं बोलून गेले आणि आम्ही पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांचं आमंत्रण सहर्ष स्विकारलं. डेट्रोईट ते बॉस्टन प्रवासाची आखणी सुरू केली. खरंतर हा प्रवास बराच लांबचा आहे. पण अंगात खुमखुमी (काही लोकं ह्याला खाज म्हणतात) आणि दुसरं (आणि महत्वाचं) म्हणजे अशक्त खिसा ह्या दोन कारणांमुळे विमानाने दोन तासांत न जाता पंधरा तास ड्राईव्ह करून जाण्याचं आम्ही ठरवलं. जाताना ऑफिसमधून थोडं लवकर निघून मग अर्ध्या रस्त्यात थांबून विश्रांती घेऊन दुसर्‍या दिवशी उरलेला प्रवास करण्याचं ठरलं.

डोंगरदर्‍यांमधून वळणं घेत जाणारा रस्ता...
Desc
गाडी चालवाणारे आम्ही दोघं असलो तरी ही गाडी चालवताना रत्याकडे तिच्या पेक्षा जास्त लक्ष माझं असतं. त्यामुळे 'विश्रांती' अशी काही नसते. पण थोड्याच वेळाने तिचं गाडी हाकणं बघून मी थोडा निश्चिंत झालो. सुदैवाने रस्त्यावर कुठेच ट्रॅफिक नव्हता त्यामुळे ठरलेल्या वेळेत (रात्री अकरा वाजता) हॉटेलवर पोहोचता आलं.

हॉटेलमधे चेक-इन करताना तिथे ल्युसील बॉल (आय लव लुसी फेम) ची बरीच चित्र दिसली. त्याविषयी जास्त चौकशी केल्यावर ते गाव (जेम्सटाऊन, NY) हे ल्युसीचं माहेर असल्याचं समजलं. एखादं अनपेक्षित बक्षिस मिळाल्याचा आनंद आम्हाला झाला. दुसर्‍या दिवशी पुढचा प्रवास चालू करण्यापूर्वी थोडा वेळ गावात चक्कर मारायचं नक्की झालं.
lucy 

गाव तसं एकदम छोटंसंच. ल्युसीच्या जन्मशताब्दी निमित्त सगळं गाव नटलं होतं. तिच्याविषयी वाटणारा अभिमान त्या गावातल्या प्रत्येक गोष्टीतून दिसून येत होता.

फर्स्ट लेडी ऑफ कॉमेडी. 

आम्ही अगदी सकाळी सात आठ वाजता ल्युसीच्या गावात फेरफटका मारून पुढचा उरलेला प्रवास सुरू केला. जवळ जवळ आठ तास प्रवास झाला होता. कधी एकदा बॉस्टनला पोहोचतोय असं झालं होतं.
 
शेवटी एकदाचा बॉस्टनला जाणारा फाटा घेतला. दामल्यांच्या घरी पोहोचताच जेवणावर ताव मारला.

केप-कॉडवरून अटलांटीक मधे व्हेल दर्शनासाठी जाता येतं एवढंच माहीत होतं. त्यामुळे तिथे कूच केलं. पण सगळी जनताच जणू तिथे जाण्यासाठी निघाली होती त्यामुळे दीड तासाच्या प्रवासासाठी जवळ जवळ तीन तास लागले. सुदैवाने बोटीची तिकीटं मिळाली. आम्ही व्हेलदर्शनासाठी सज्ज झालो.

अर्थात व्हेल दर्शनासाठी केपकॉडलाच गेलं पाहिजे असं नाही. इतरही बर्‍याच ठिकाणांहून बोटींची सोय आहे पण केप कॉड गावही बघण्यासारखं आहे. ("गावकरी"ही बघण्यासारखे आहेत).

बोटीचा प्रवास सुरू झाला, माहीती देणारी बाई माईकमधे काहीतरी बडबड करत होती पण प्रत्येकाची नजर पाण्यावर होती. अर्ध्यातासांत समुद्रात बर्‍यापैकी आत गेल्यावर प्रथम सलामी मिळाली.
 
लोकांनी उस्फुर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली. नंतरचे तीन तास कसे गेले ते समजलंच नाही.



व्हेल हे कळपात राहणारे सस्तन प्राणी आहेत. पुस्तकात घोकून पाठ करण्यापेक्षा प्रत्यक्ष बघून शिकणार्‍या माझ्या मुलाचाच मला हेवा वाटला.


 कित्येक गॅलन पाणी एका दमात पिताना...

अनोखी मैत्री

एकाच वेळी सगळे एकदम उसळी मारून वर येताना..


छोट्या माश्यांना अडकवण्यासाठी एकावेळी चार ते आठ व्हेल पाण्यातून बुडबुडे सोडतात...


मग अश्या गोंधळलेल्या छोट्या माशांचा घास घेण्यासाठी सगळे उसळून वर येतात.

जेव्हा पुन्हा खाली बुडी मारतात तेव्हा वर अशा प्रकारे पाण्याचा तवंग दिसतो. याला त्यांच्या 'पाउलखुणा' म्हणतात.

व्हेलच्या पंगतीला आपलीही पोटं भरणारे पक्षी.

सूर्य मावळतीला आला, आमच्या जाण्याची वेळ झाली.


दुसर्‍या दिवशी बॉस्टनच्या डाउनटाऊन मधे जाणार होतो, तेसुद्धा ट्रेनमधून, म्हणून छोटू खूष होता. त्याला हे सुख आमच्या गावात मिळत नाही.

न्युयॉर्कच्या सेंट्रलपार्कप्रमाणेच शहराच्या मध्यभागी बॉस्टन कॉमन्स ही बाग आहे. 
 



रुणूझूणू रे भ्रमरा





जिकडे पाहावं तिथे उत्साह दिसत होता.  



ताजची इथेही शाखा आहे वाटतं!
 

जुन्या चर्चला लागूनच नव्या इमारती उभ्या आहेत. इथल्या इतर जुन्या इमारतीही प्रेक्षणीय आहेत.

घरी परतताना छोट्याच्या खास आग्रहा वरून घराजवळच्या चौपाटीवर गेलो. गिरगाव चौपाटीवर कधी एके काळी खाल्लेली भेळ आठवून मी एकदम नॉस्टॅल्जिक का काय म्हणतात ते झालो.

तर अशा प्रकारे दोन दिवस मस्त मजा करून चार जुलैला परतीच्या प्रवासाला लागलो. ह्या वेळी कुठे हॉटेलमधे थांबणार नव्हतो त्यामुळे सकाळी लवकरच निघालो.

 दिवस मावळेपर्यंत प्रवास चालूच होता.

परतीच्या प्रवासात लागलेला टोलीडो (ओहायो) ब्रिज

एकूण प्रवासः १९७० मैल, जवळ जवळ तीस तास.
 

अविस्मरणीय चार दिवस.