Monday, May 9, 2011

ट्युलिपोत्सव

एप्रिल संपून मे महिना उजाडला तरी खर्‍या अर्थाने वसंत ऋतूचं दर्शन काही आम्हा अभाग्यांना झालेलं नव्हतं. नाही म्हणायला उगाच कुठेतरी एखादं झाड पालवलं होतं पण बरेचशी झाडं अजून निष्पर्णच होती. हवा सुधारेल सुधारेल म्हणता म्हणता ऋतू अर्धा संपत आला. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात (मे ८ ते मे १४) मिशिगन मधल्या हॉलंड या गावी ‘ट्युलिप उत्सव’ असतो. ह्यावर्षी तिथे जायचं असं आम्ही काही महिन्यांपूर्वीच ठरवलं होतं. पण एकंदर हवामान पाहता तिथे जाऊन निराशा तर होणार नाही ना अशीच धाकधूक वाटत होती. पण देवाला आमची दया आली असावी आणि चक्क शनिवारी पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

सक्काळी आठ वाजताच निघायचं असं ठरवून आम्ही साडे-नऊ पर्यंत घरा बाहेर पडलो ;-) बाहेर स्वच्छ ऊन पडलं होतं. ‘गणपती बाप्पा मोऽऽरया’ म्हणून गाडी चालू केली आणि अडिच तीन तासांतच हॉलंडला येऊन पोहोचलो.

थोडं ह्या जागेविषयी. हॉलंड हे मिशिगनच्या पश्चिम किनार्‍यावरचं एक गाव. जवळ जवळ दोन-अडिचशे वर्षांपूर्वी साठ जणांचं एक टोळकं नेदरलॅंडवरून इथे आलं. त्यांनी इथे आधीपासून राहात असलेल्या ‘ओटवा’ (रेड इंडियन) लोकांकडून जागा “विकत” (इथे बरेच मतभेद आहेत) घेतली आणि वसाहत सुरू केली. आपल्याकडे बिहार-युपी वरून येणारे लोक जे करतात त्याच प्रमाणे मग हळूहळू इथे डच वस्ती वाढायला सुरवात झाली. नेदरलॅंडचे प्रतिक म्हणून १९२८ सालच्या ऑगस्ट/सप्टेंबर मधे जवळ जवळ अडिच लाख ट्युलिप फुलांची लागवड केली आणि मे महिन्यात जेव्हा जागोजागी फुलांचे ताटवे दिसू लागले तसे शेजारच्या छोट्य-मोठ्या गावांमधून लोक ते बघायला आले आणि ट्युलिप उत्सवाची सुरूवात झाली. तेव्हा पासून आजतागायत दर वर्षी (जागतीक महायुद्धातली काही वर्ष सोडून) ट्युलिप उत्सव मोठ्या थाटात साजरा होतोय.



डच लोकांचा पारंपारिक वेष घालून लहान मुलांपासून ऐंशी नव्वदीचे आजी - आजोबा उत्सवात सहभागी होतात. गावात एक मोठं कॉलेज आहे. त्यामुळे तरूणाई सगळीकडे दिसून येतेच. महत्वाचं म्हणजे ट्युलिप उत्सवात सगळीकडे स्वयंसेवक म्हणून हेच तरूण काम करत असतात. कुठेही ‘हे कसले भोंगळ कपडे घालायचे!’ म्हणून आपल्याच परंपरेची लाज त्यांना वाटत नाही. उलट त्यांच्या वेषभूशेविषयी आवर्जून माहिती देतात. डोक्यावरची टोपी हे श्रीमंतीचं प्रतिक होतं. टोपी जितकी मोठी तितका तो माणूस श्रीमंत.

आम्ही गावात पोहोचलो तेव्हा डच लोकांचं पारंपारिक नृत्य चालू झालं होतं. इथल्याच कॉलेजमधल्या तरुण तरूणी हा नाच करतात.

डच पारंपारिक वेषभूशेतला डोळ्यात भरणारा प्रकार म्हणजे त्यांचे लाकडी बूट. कातड्याची कमतरता असल्यामुळे डच लोक लाकडापासून बनवलेले बूट वापरायचे. पण पायाला लागू नये आणि मुख्य म्हणजे बूट पायातून निसटून जाउ नये म्हणून आठ नऊ मोजे एकावर एक चढवून मग हे बूट घालायला लागतात. नाचताना एखाद्याचा बूट उडाला तर एखाद्याचा कपाळमोक्षच व्हायचा.



इथे बघावं तिथे ह्या फुलांचे ताटवे दिसतात. लोकांच्या परसात, पार्किंग लॉट मधे, रस्त्याच्या कडेला.. जिथे जिथे जागा होती ती ह्या सुंदर फुलांनी भरली होती. जवळ जवळ साठ लाख फुलं सगळ्या गावात लावली होती (इती: माहीतीपुस्तक) त्यामुळे फोटो किती काढू आणि किती नको असं होऊन गेलं होतं. आम्ही जवळजवळ पाचशे फोटो काढले. (सगळे इथे टाकले नाहियेत. काळजी नसावी) शेवटी क्यामेराची ब्याटरी संपली.















जवळ जवळ प्रत्येक रंगाचे ट्युलिप इथे बघायला मिळतात. ट्युलिप्सच्या वेगवेगळ्या जातीं आम्हाला इथे समजल्या. नावं अगदी समर्पक होती.










हा इथे बघायला मिळालेला आणखी एक अजब नमुना. आता यात काय विशेष आहे? ह्या आजीबाईंच्या खांद्यावर बसलेल्या पोपटाकडे (मकाव) नीट पहा. ह्या पोपटाने डायपर घातलाय! बर्डी डायपर म्हणे.


हा नमुना नंबर दोन. तासन॑ तास एका जागेवर एका पोज मधे उभा राहणारा हा पुतळा. मधूनच एखाद्या प्रेक्षकाकडे बघून डोळा मिचकावतो तेव्हा बघणारा क्षणभर हादरतो.



प्रत्येक डच गावांमधे हमखास आढळणारी पवनचक्की. ही पवनचक्की दीडशे वर्षांपूर्वीची आहे. पण वरचेवर डागडूजी केल्यामुळे आजही चालू अवस्थेत आहे.



ह्या गिरणीच्या आतमधे जुन्याकाळी वापरली जाणारी हत्यारं जपून ठेवली आहेत.


ह्या चक्कीचं नाव देझ्वान. पूर्वीच्या काळी अशा प्रकारची गिरण हीच गावातली सगळ्यात उंच इमारत असल्यामुळे चक्कीचा वेगवेगळ्याप्रकारे उपयोग व्ह्यायचा. पवनचक्की बंद असताना चक्कीचा मालक तिची पाती एका विशिष्ट प्रकारे ठेवायचा. त्याचा उपयोग लोकांना वेगेवेगळे संदेश देण्यासाठी व्ह्यायचा. उदा॰ यंदा पिक चांगलं आहे किंवा हवामान खराब आहे वगैरे. तसेच गावातल्या आनंदाच्या प्रसंगी पवनचक्कीला दिव्यांनी उजळून टाकण्यात येई. युद्धाच्या काळात अश्या इमारतींचा उपयोग टेहाळणी बुरूज म्हणूनही होत असे.


बाजूच्याच मैदानावर लुटूपुटूच्या लढाई होणार होती. सगळा जामानिमा घालून तयारीने बसलेले हे सैनिक. (आम्ही गेलो तेव्हा त्यांची लढाई संपलेली होती.)



श्रमपरिहार करत काही सैनिक निवांत बसून आवडती सुरावट आळवत बसले होते.


संध्याकाळचे सात वाजत आले तेव्हा निघायची वेळ झाली म्हणून गाडीकडे जायला निघालो. तेवढ्यात ही’ला दुकानात काहीतरी दिसलं. इतका वेळ भटकून माझे पाय भयंकर दुखायला लागले होते. कुठेतरी टेकायला मिळतंय का बघत मी दुकानाच्या पाठीमागच्या बाकांकडे जायला लागलो. तर हे नयनरम्य दृष्य बघायला मिळालं.


आमचं नशिब तेव्हा नक्कीच बलवत्तर असणार कारण आजवर कधिही न बघितलेलं आणि ज्याविषयी नुसतं खूप ऐकलेलं असं मयुरनृत्य आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं.




आम्हाला जरी ह्या मोरोपंतांचं खुप खुप कौतूक वाटत असलं तरी लांडोरबाई फारशा इंप्रेस झालेल्या दिसल्या नाहीत. शेवटी 'घरका मोर मुर्गी बराबर' हेच खरं.



असो, तर अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस सत्कारणी लागला. इतके दिवस थंडीने कोमेजलेलं मन पुन्हा रिजार्ज करून आम्ही घरी परतलो.

No comments:

Post a Comment